मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या काल रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले. किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांना बाजूला करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली होती. याप्रकरणी सोमय्या यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांच्यावर उलटी तक्रार दाखल केली आहे.
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांनी खार पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत किरीट सोमय्या यांनी खार पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर कालच्या हल्ल्या प्रकरणी किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात सोमय्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला असल्याचे पाहायला मिळाले.
पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या काय म्हणाले?
किरीट सोमय्या म्हणाले, “माझ्यावरील कालचा हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता. मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो असे सांगितले होते. पण पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे असे सांगितले. पण पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले”.
महत्वाच्या बातम्या –


