मुंबई : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तें यांच्याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. एसटी विलीनीकरणाच्या लढ्याचा संप हाती घेतल्यानंतर आणि त्याचे परिणामांना सामोरे गेल्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटी बँक निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावण्याची तयारी दर्वशली आहे. याकरता सदावर्ते हे स्वतःचे स्वतंत्र पॅनल उभं करण्याच्या जोरदार तयारीत आहेत.
२६ एप्रिलला जामिनावर बाहेर पडल्यानंतर आता ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. एसटी बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करणार आहेत. यासाठीची त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. एसटी बँकेचे महाराष्ट्र राज्यात तब्बल ९० हजार मतदार आहेत. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एसटी कामगार संघटनेची आता सत्ता आहे. याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत संघटनेच्या विरोधात सदावर्ते शड्डू ठोकणार आहेत. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांचा लवकरच सक्रिय राजकारणात चंचूप्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे आणि काही कामगारांकडून एसटी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एसटी संपात हजारो कामगारांवर कारवाई झाली. यामुळेच हजारो एसटी कामगार हे मतदानासाठी पात्र नाहीत. या कारणामुळेच त्यांनी होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक आता पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे. दोन हजारपेक्षा अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय चुरस पाहायला मिळते. सध्या एसटी बॅंकेवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला सदावर्ते कसे आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

