🕒 1 min read
जालना: बदनापूर तालुक्यातील ढासला येथील गावकऱ्यांनी सामाजिक सलोखा राखत ग्रामसभेत मंदिरातील घंटानाद आणि मशिदीवरील भोंगा उतरवले जाणार नाही हा निर्णय घेतला आहे. मशिदीवरील भोंग्याचा आम्हा गावकऱ्यांना कुठलाच त्रास नाही. कुणी काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या गावातील मशिदीवरील भोंगा काढणार नाही. जातीयवादाला थारा देणार नाही अशी भूमिका जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील ढासला गावाच्या ग्रामसभेत घेण्यात आली आहे.
“अजानच्या वेळेनुसार गावातील सर्व समाजातील लोकांची दिनचर्या चालते. सकाळी अजान ऐकू येताच सर्व लोक जागे होऊन आपापल्या दैनंदिन कामास सुरुवात करतात. दुपारी दीड वाजता अजान ऐकून शेतातील काम करणारी मंडळी जेवणासाठी थांबतात. पुन्हा सायंकाळी पाच वाजेच्या नमाजनंतर मजुरांना कामावरुन सुट्टी दिली जाते. ७ च्या नमाजनंतर जेवण केलं जातं. रात्री साडे आठच्या नमाजनंतर ग्रामस्थ झोपतात” अशी दिनचर्या गावकऱ्यांनी सांगितली आहे. तसेच अजान, आरती, हरिपाठ या आमच्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी सध्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय चर्चिला जात असला, तरी आम्ही मात्र कधीच भोंगे उतरवणार नाही, असेही ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले आहे.
ढासला गावची लोकसंख्या २ हजार ५०० असून गावात १ हजार ८०० हिंदू, ४०० मुस्लिम तर ३०० ईतर समाजाचे लोक राहतात. गावात ग्रामसभा घेऊन मंदिर, मशिदीवरील भोंगा न उतवण्याचा निर्णय घेण्यात आला. मशिदीवरील भोंग्याचा आम्हाला कोणताही त्रास होत नसून सकाळच्या दिनचर्येनंतर प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो, असे स्पष्ट सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
