जालना : आज उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आला. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार म्हणाले, “प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते.कोल्हापूरला देखील असंच झालं. कोल्हापूरला एक जागा खाली होती त्या ठिकाणी राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला.” असा टोला शरद पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
जालन्यातील कार्यक्रमात पवार यांनी भाजपला हा टोला लगावला. “शेतकऱ्यांना हक्काचे पैसे देणारं पीक हे ऊस असल्यानं शेतकरी ऊस लागवड करतात. मात्र ऊस लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना 6 महिने काही काम राहत नसल्यानं गावात फिरत मोदीपासून सगळ्याच राजकारणाच्या गप्पा मारत बसतो. असा टोला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील लागवला आहे.”
आज पवार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी पवार यांच्या हस्ते अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथनॉल प्रकल्पाच उद्धाटन करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘साखरेची किंमत ही ऊसाची किंमत ठरवते. साखर कारखानदरी चालवणे सोपे नाही यापेक्षा विधानसभा निवडणूक सोपी पण कारखाना चालवणं अवघड असं सांगत राज्यातील सर्व कारखाने अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.


