मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत मतदान झाले आहे. यापूर्वी राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अशा स्थितीत शिवसेना आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा एकशे एकवेळा हनुमान चालिसा पठण करून मतदानाला आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार रवी राणा आणि शिवसेना यांच्यात तिव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “माझ्यावर गुन्हे दाखल करणारे, मला जेलमध्ये टाकणाऱ्यांचा विनाश होईल. तसेच राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी होतील. विधान भवनात हनुमान चालीसा आणणे हे सुद्धा गुन्हा आहे का?”, असा प्रश्न रवी राणा यांनी उपस्थित केला.
रवी राणा म्हणाले, “हनुमान चालिसा मातोश्री समोर म्हटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधान भवनात जात आहे. आता गुन्हा दाखल होतोय का ते पहातो. उद्धव ठाकरे म्हणतात काशमीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरे ज्या वेळी हनुमान चालिसा वाचतील त्यादिवशी मी काश्मीरमध्ये जाऊन वाचेन.”
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत 42 मतांऐवजी विजयासाठी 41 मतांची गरज आहे. कारण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान करता येणार नाही. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

