मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी काल महाराष्ट्रात आले होते. भिवंडी येथे त्यांनी एक सभा घेतली. सभेला संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्यं केले. अंडरवल्ड डॉन दाऊदशी संबंध आणि दाऊदच्या निकटवर्तीयांशी आर्थिक व्यवहार या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवारांवर टीका करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “शिवसेना खासदार संजय राऊत अडचणीत आल्यावर शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेतात, मग नवाब मलिक यांच्यासाठी का नाही?” असा सवाल ओवेसींनी विचारला आहे. “शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी पंतप्रधान आणि सध्या देशाचे बादशाह होऊन बसलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संजय राऊतांवर कारवाई करु नका सांगितलं. त्यांना जेलमध्ये टाकू नका, कारवाई करु नका यासाठी सांगितलं. पण त्यांना नवाब मलिकांची आठवण का झाली नाही ? हे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना विचारायचं आहे,” असे ओवेसी म्हणाले.
“शरद पवारांनी नवाब मलिकांचं नाव का घेतलं नाही? पंतप्रधानांना भेटत असताना तुमच्याच पक्षाचे एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दलही बोलायचं ना,” असे ओवेसी म्हणाले. “नवाब मलिक हे संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का? मला शरद पवारांना विचारायचं आहे की, तुम्ही नवाब मलिकांसाठी पंतप्रधानांकडे जाऊन का बोलला नाहीत? ते केवळ मुस्लिम आहेत म्हणून का? नवाब आणि संजय राऊत समान नाहीत का?,” असेही ओवेसी म्हणाले.
देशात सध्या वादाचा विषय बनलेल्या ज्ञानव्यापी मशिदीवर आणि ताजमहालाच्या मुद्द्यांवरुन त्यांनी जोरदार हल्ला केला. मुस्लिम संस्कृतीवर, मुस्लिम अस्मितेवर अतिक्रमण होत आहे. मुस्लिमांची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओवेसींनी केला आहे. हलाल, हिजाब, अजान या सगळ्या बाबींवर आता आक्षेप घेतले जात आहेत, अशी खंत ही ओवेसींनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

