🕒 1 min read
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यासह मिताली राजची २३ वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. १९९९ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मितालीने दीर्घकाळ भारताचे नेतृत्व केले आहे. मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक शानदार खेळी खेळल्या. आम्ही तुम्हाला मिताली राजच्या अशाच एका खेळीबद्दल सांगत आहोत जेव्हा मिताली राजने पाकिस्तानच्या गोलंदाजाचा धुव्वा उडवला होता.
२०१३ साली एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला जात होता. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी कटक येथे भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये या विश्वचषकाचा सामना खेळला गेला. पाकिस्तानची कर्णधार सना मीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांचे दोन्ही सलामीवीर नाहिदा खान आणि सिद्रा अमीन २८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर नैन अबिदीने ५८ आणि निदा दारने ६८ धावा केल्या. अशा प्रकारे या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने ५० षटकात ७ गडी गमावत १९२ धावा केल्या.
मिताली राजने खेळली ऐतिहासिक खेळी
भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी १९३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिली विकेट ८ धावांवर पडली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली पूनम राऊत ४ धावा करून बाद झाली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मिताली राजने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मात्र, यादरम्यान दुसऱ्या टोकाला भारताच्या विकेट पडत राहिल्या. पण मितालीने एका टोकाला पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
मिताली राजने आपल्या जबरदस्त फलंदाजीमुळे हा सामना एकतर्फी केला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी तिला बाद करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण अपयश आले. मिताली राजने १०३ धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून विश्वचषकातील कोणत्याही महिला क्रिकेटपटूची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला
भारतीय संघासाठी हरमनप्रीत कौरने या सामन्यात १६ धावा केल्या. त्याचवेळी सुलक्षणा नायक ३ धावा करून बाद झाली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रीमा मल्होत्राने नाबाद २५ धावांची खेळी केली. मिताली राजने या सामन्यात १४१ चेंडूत १०३ धावा केल्या. भारताने हा सामना ४ षटके बाकी असताना ६ विकेटने जिंकला. शतकी खेळी करणाऱ्या मिताली राजला सामनावीरचा किताब देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
