मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज कटक येथे खेळला जाणार आहे. दिल्ली येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरला मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र या सामन्यात ज्याप्रकारे वेगवान गोलंदाजांविरुद्ध अय्यरने फलंदाजी केली त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते, वेगवान गोलंदाजांविरुद्ध अय्यरचा स्ट्राइक रेट हा चिंतेचा विषय आहे आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. जर आपण श्रेयस अय्यरबद्दल पाहिलं, तर पहिल्या टी-२० सामन्यात त्याने फिरकीपटूंविरुद्ध खूप धावा केल्या. मात्र, वेगवान गोलंदाज समोर येताच त्याला आक्रमक फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे त्याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.
श्रेयस अय्यर वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला
श्रेयस अय्यरच्या या कामगिरीवर आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “श्रेयस अय्यरबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्याचा स्ट्राइक रेट फिरकीविरुद्ध खूप जास्त आहे. फिरकीपटूंविरुद्ध त्याने अवघ्या आठ चेंडूत २४ धावा केल्या होत्या पण वेगवान गोलंदाज समोर येताच त्याचा स्ट्राईक रेट ८५ ते ११५ असा कमी झाला.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “फिरकी आणि वेगवान गोलंदाजांमध्ये फरक खूप मोठा आहे. इशान किशन आऊट झाल्यानंतर रबाडा आणि एनरिक नॉर्टजे यांच्या पुढच्या दोन षटकांत केवळ चार ते पाच धावा दिल्या. या दोन षटकांत एकेरी धावा आल्याने संघ दडपणाखाली आला.” याअगोदर माजी सलामीवीर वसीम जाफरनेही श्रेयस अय्यरला वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी सुधारण्यास सांगितले होते. तो म्हणाला की, जर अय्यरला अव्वल ४ मध्ये फलंदाजी करायची असेल तर त्याला वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी शैलीत सुधारणा आवश्यक आहे. अय्यरने वेगवान गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली असती तर संघाच्या आणखी काही धावा होऊ शकल्या असत्या.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने २७ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. त्याने या सामन्यात फिरकी गोलंदाजीविरुद्ध वर्चस्व गाजवले. मात्र वेगवान गोलंदाजीविरुद्ध त्याला मोठे फटके खेळता आले नाही. अय्यरने यंदाच्या आयपीएल हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ३०.८४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या होत्या. यात त्याने तीन अर्धशतकं झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

