🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला आशिष नेहराने त्याच्या प्रशिक्षणामध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. नेहराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर तो तिथे असता तर पहिल्या टी-२० सामन्यात आवेश खानऐवजी अर्शदीप सिंगला संधी दिली असती,’ असे नेहराने म्हटले आहे. मात्र, आता आवेशने एक सामना खेळला असल्याने तो दुसऱ्या सामन्यातही खेळेल आणि दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात बदल करणार नाही. आवेश खान आणि अर्शदीप सिंग हे दोघेही आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून आले आहेत.
अर्शदीप सिंगबद्दल सांगायचे तर, त्याने आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. त्याने १४ सामन्यात १० गडी बाद केले पण या वेळी त्याचा इकॉनॉमी रेट खूप चांगला राहिला होता. त्याने ७.७० च्या इकॉनॉमी रेटने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली. अर्शदीपने डेथ षटकांमध्ये ज्या प्रकारची अचूक गोलंदाजी केली ते पाहून सर्वजण प्रभावित झाले आणि त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली. दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अर्शदीप ऐवजी संघ व्यवस्थापनाने आवेश खानवर विश्वास व्यक्त केला. मात्र आशिष नेहराच्या मते अर्शदीपला पहिल्या सामन्यात संधी मिळायला हवी होती.
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज नाही
क्रिकबझवरील संवादादरम्यान नेहरा म्हणाला की, ” पहिल्या सामन्यासाठी आवेश खानऐवजी अर्शदीप सिंग माझी पहिली पसंती असता. पुढचा सामना कटकमध्ये आहे आणि इथेही सहसा खूप धावा केल्या जातात. केवळ तुमच्या गोलंदाजांनीच धावा दिल्या असे नाही. तुम्ही २११ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना १०-१५ षटकांपर्यंत सामन्यात होते. सरतेशेवटी, दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी खेळाची दिशा बदलवली आणि सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघात बदलाची गरज आहे असे मला वाटत नाही.” नेहरा पुढे म्हणाला की, “केएल राहुल आणि कुलदीप यादव संघात नाहीत आणि भारतीय संघाने एकाच प्लेइंग इलेव्हनला घेऊन सलग ३ सामने खेळले पाहिजेत. भारताने पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेऊन घाबरून न जाता दुसऱ्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
आशीष नेहराने आयपीएलच्या पहिल्या हंगामात उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्याचबरोबर आशिष नेहरा आयपीएल विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक बनला. आयपीएल सुरू झाले तेव्हा गुजरात टायटन्स संघाकडे पाहून कोणीही असा विचार केला नव्हता की गुजरात संघ विजेतेपद मिळवेल. मात्र आशिष नेहराच्या प्रशिक्षणा खाली या संघाने पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली. अनेक प्रस्थापित संघांचा त्यांनी या हंगामात पराभव केला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
