मुंबई : शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी करण्यास सुरू केले आहे. सोबतच त्यांच्या मुंबईस्थित वांद्रेभागातील घरातही कारवाई सुरु आहे. एकूण सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने कारवाई सुरू केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांच्यावर खोचकपणे टीका केली आहे.
“ही तर कर्माची फळं, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला” अशी शब्दात सदावर्ते यांनी अनिल परबांवर टीका केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि कामगारांच्या तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे परिवहन खातेचं पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. हे तर कर्माची फळं आहेत.” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. यावेळी त्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला.
“लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच” असा टोला लगावत त्यांनी आता मनी लॉंडरिंग प्रकरणातील गुन्ह्याची पूर्णपणे उकल होणार आहे, असं सांगितलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी काही एसटी कर्मचारी देखील उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांनीही एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

