🕒 1 min read
मुंबई : हनुमान चालिसा वादावरून चर्चेत आलेले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे. दोघांनाही आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, आज न्यायालयाने त्यांना वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३५३ अन्वये दाखल केलेल्या गुन्ह्यात या दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मुंबईतील बांद्रा येथील मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याविरुद्ध देशद्रोह आणि इतर कलमांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. राणा दाम्पत्याला ४ मे रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि ५ मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना समन्स
नवनीत राणा यांनी मुंबईत तुरुंगात असताना छळ झाल्याची तक्रार विशेषाधिकार समितीकडे केली होती. त्यानंतर लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने महाराष्ट्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना 15 जून रोजी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजप खासदार सुनील सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. खासदार राणा यांनी आपल्या गैरवर्तनाची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. सभापतींनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
