🕒 1 min read
मुंबई : भाजपने राज्यसभेच्या सहापैकी तीन जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीला या निवडणूकीत धक्का बसला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मत फुटल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विधानपरिषद, राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान काळजी घ्या, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. आज राष्ट्रवादीची महत्वाची बैठक शरद पवारांच्या निवास्थानी पार पडली. शुक्रवारी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक विजयी झाले. त्याचवेळी शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांनीही राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना भाजपच्या महाडिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. साधारणत: राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांना परावभ पचवावा लागला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
