औरंगाबाद: शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर औरंगाबाद येथे सभा होत आहे. कोरोना आणि लॉकडाऊन, निर्बंध इत्यादी गोष्टीत दोन वर्ष गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच आता औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत आहे. औरंगाबादचे नामांतर हा विषय सभेच्या मुख्य स्थानी असणार, असे बोलले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये झालेली सभा, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणं आणि राज्यसभेची निवडणूक या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नेमकं कोण कोण राहणार आहे हे पाहणंही महत्वपूर्ण राहणार आहे. तसेच ही सभा विक्रमी गर्दीची आणि ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील गावागावात सभेचा प्रचार शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरु आहे. सोबतच औरंगाबाद महापालिका निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर या सभेला अधिक महत्त्व आलं आहे. तसेच सभेच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने तिसरा टीझर जारी केला आहे. या टीझर मधून सभेचा रोख कसा असेल, याची झलक पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेचा तिसरा टीझर लॉन्च करण्यात आलं आहे. टीझरमध्ये उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत असल्याचं दिसत आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे आहेच ना संभाजीनगर. हिंदू आहोत आम्ही. हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी ‘देव, देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म’ ही कॅच लाईन टाकण्यात आली आहे. तसेच येत्या ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता औरंगाबादच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार असल्याचं या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. ३० सेकंदाच्या या टीझरमध्ये सभेची विराट गर्दी दाखवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

