🕒 1 min read
मुंबई : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने बंगाल क्रिकेट संघासोबतचे संबंध तोडण्याबाबत मौन सोडले आहे. रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी बंगालच्या संघात साहाची निवड झाली असली तरी या मोसमात तो संघाकडून खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर अनेक क्रिकेट संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे साहाने सांगितले. मात्र तो कोणत्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. गेल्या वर्षी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने वृद्धिमान साहाच्या संघाविषयी बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर रागाच्या भरात साहाने त्याचे बंगाल संघासोबतचे १५ वर्षे जुने नाते तोडले होते.
बंगालकडून २००७ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या साहाने सांगितले की, “१५ वर्षे बंगालकडून खेळल्यानंतर हा निर्णय घेतल्याने मला खूप दुःख झाले आहे. मी इतकी वर्षे बंगाल कडून घरेलू क्रिकेट खेळलो तरीही माझ्या बांधिलकी आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हे माझ्यासाठी निराशाजनक होते.”
प्रामाणिकपणावर शंका घेतल्याने मन दुखावले: साहा
स्पोर्ट्सस्टारशी बोलताना वृद्धिमान साहाने सांगितले की, “माझ्यासाठीही खूप दुःखाची भावना आहे की इतके दिवस बंगालसाठी खेळल्यानंतर मला अशा परिस्थितीतून जावे लागले. लोक अशा कमेंट करतात आणि तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेतात हे निराशाजनक आहे. एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. परंतु आता ते माझ्या बाबतीत घडले आहे. त्यामुळे मला देखील पुढे जाणे आवश्यक आहे.”
Wriddhiman Saha has refused to play for Bengal in the Ranji Trophy knockouts. He's also left team's WhatsApp group. (Reported by Indian Express).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2022
मी CAB अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटेन
तो पुढे म्हणाला, “मी बंगालसाठी खेळणार नाही, असे मी मनाशी ठरवले आहे. मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांना फोनवरून याबाबत कळवले होते. पण, मी त्यांना आता वैयक्तिकरित्या भेटेन आणि बंगाल संघातून माझ्या जाण्यासंदर्भातील औपचारिक गोष्टी पूर्ण करून एनओसी मिळवीन.”
वृद्धिमान साहा आता पुढील हंगामात नव्या संघासोबत देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, तो कोणत्या संघात सामील होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत साहा म्हणाला, “मी अनेक क्रिकेट असोसिएशनशी बोललो आहे. पण अद्याप कोणताही निर्णय मी घेतलेला नाही. पुढील हंगामासाठी अजून वेळ आहे. त्यामुळे याबाबत मी जेव्हा जेव्हा निर्णय घेईन तेव्हा सर्वांना त्याबाबत माहिती देईन.”
आयपीएल २०२२ चे विजेतेपद जिंकल्याचा मला आनंद
वृद्धिमान साहाने गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामातच आयपीएल विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विजयाबाबत तो म्हणाला, “गुजरात टायटन्सच्या विजयात मला हातभार लावता यावा म्हणून मी आयपीएलमध्ये भाग घेतला. आम्ही विजेतेपद जिंकले याचा मला आनंद आहे, मात्र पुढे काय होईल किंवा काय व्हायला हवे याचा मी फारसा विचार करत नाही? माझे काम चांगली कामगिरी करणे होते आणि मी तेच केले.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
