मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारस्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. त्यावर शिवसेनेच्यावतीने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे प्रकरण घटनात्मकदृष्ट्या महत्वाचे असल्याने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच सुनावणीसाठी पुढील तारीखही स्पष्ट न केल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालय या देशात कायद्याची व घटनेची पायमल्ली होऊ देणार नाही. कोर्ट महाराष्ट्रातील सर्व बाजू समजून घेईल. जे घटनेला मान्य त्यानुसार न्याय मिळेल याची खात्री आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी कोणतीही कॉमेंट करणार नाही. कायदेशीररित्या आमची बाजू भक्कम आहे. 10 व्या परिशिष्टानुसार होईल तो निर्णय होईल, असं ते म्हणाले. कोर्टाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, ‘न्यायाला विलंब म्हणजे, न्याय नाकारणं’ असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. पुढे दोन तृतीयांश आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात पण त्यांचा एक गट म्हणून त्यांना प्रस्थापित करता येणार नाही, असं कायदा सांगतो. पण असं असतानाही गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून आपण पाहतोय तो शिवसेनेचा गट कोणता? म्हणजे तुम्ही कायद्याचे धिंडवडे काढत आहात आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टही गप्प आहे, असं सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

