मुंबई : माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा पक्ष उभारणीची मोहीम हाती घेतली आहे. ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेत आहेत. तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटित करण्याचेही काम केले जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह गटातील बंडखोर आमदार संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सन्मानाने मातोश्रीवर बोलवले तर जाऊ असे म्हटले होते. तसेच केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी बोलून चर्चा करावी असेही म्हटले होते. शिवसेना भवनातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे. आपण बंडखोर आमदारांना समोर येऊन चर्चा करण्याचे यापूर्वीच आवाहन केल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
“मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मात्र एवढ्या दिवस ते अगोदर एकदम गप्प होते. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती,” असा उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“याच भाजपच्या लोकांनी शिवसेनेवर विकृत भाषेचा वापर केला, अनेक अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे शिवसेना आणि मातोश्री विषयी प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” असा सवालही यावेळी ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला आहे.
माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मातोश्रीवर सन्मानाने बोलावलं, असे बोलणाऱ्यांना मातोश्री, आदित्य, उद्धव यांच्याबाबत प्रेम आहे, याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण हे जे प्रेम दाखवता, तेच प्रेम दोन अडीच वर्ष कुठे होतं, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


