मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी भोंगा प्रकरणावरूनही टीका केली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘चीनचे सैन्य गलवान व्हॅलीत घुसून बसले आहे. तेथे हिंदुत्वाची गर्जना फिकी पडत आहे. मुंबईत मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालिसाचे पठण केल्याने चिनी सैन्य मागे हटणार असेल तर आनंदच आहे. मशिदी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करून आपणच कसे हिंदुत्ववादी आहोत याचे प्रदर्शन केल्याने कश्मीरातील हिंदू पंडितांचा प्रश्न मार्गी लागणार आहे काय? पंडितांची घरवापसी होणार आहे काय? बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात ‘फाळणीपूर्व’ परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजविण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी अशी भीती डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. बंग यांचे म्हणणे असे की, संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडविण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य, नाटक व इतर साधनांचा वापर केला. डॉ. बंग यांनी जे विचार व्यक्त केले ते ‘जेएनयू’पासून कर्नाटकपर्यंत खरे होताना दिसत आहेत. धार्मिक द्वेषाचे राजकारण देशाचे पुन्हा तुकडे तुकडे करील. बालमनावर रुजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल, असे डॉ. बंग सांगतात. त्याआधी असंख्य फाळण्यांची बीजे रुजलेली असतील. नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल का?’, असा सवालही राऊतांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- “JNU मध्ये हिंसा मांसाहारावरून झाली, पण भाजपवाले…”, राऊतांचा हल्लाबोल
- “हिंदू-मुसलमानशिवाय भाजपकडे…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
- “तेरा मुझसे है पहले का नाता कोई…”, माजी सहकाऱ्यांना भेटला फाफ; व्हिडिओ व्हायरल
- IPL 2022 : मैदानात घुसून रोहितला भेटायला आलेल्या ‘त्या’ फॅनचं पुढे काय झालं? तुम्हीसुद्धा करू नका अशी चूक!


