नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. यावेळी यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा”, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार पलटवार केला आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज आहे. जरा अमरावतीकरांकडे लक्ष द्या, नाहीतर निवडणुकीत हा शनि तुमच्यावर भारी पडेल. सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवेल, असा कारभार चाललाय तुमचा.”
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या, “हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आमची विमानतळावर अडवणूक करण्यात आली. राज्यातील मुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन”
राणा दाम्पत्याने विमानतळ ते रामनगर पर्यंत बाइक रॅलीसाठी परवानगी मागितली होती. ती पोलिसांनी फेटाळून लावली. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठणासाठी अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात मंजुरीची गरज नाही मात्र बाहेर समर्थकांसह लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, असे अटीत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

