मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सोमय्या यांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार आहे. मात्र कस्टडीतील व्यक्तीला भेटण्याचं काहीच कारण नाही. एखादी व्यक्ती कस्टडीत असते तेव्हा वकील किंवा नातेवाईक यांनाच कोर्टात जाण्याची परवानगी असते. त्यामुळे सोमय्यांनी संघर्ष वाढवायला नको होता . झालं ते चांगलं झालं नाही,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. सोमय्या यांनी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. सोमय्यांची ही मागणी वळसे पाटील यांनी फेटाळून लावली. ते काहीही मागणी करतील, पण जे नियमानुसार आहे ते होईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. या व्यक्तींना काय कारणासाठी झेड सुरक्षा दिली? कोणापासून त्यांना धोका आहे? त्यांचं असं काय कृत्य आहे कि त्यांना सुरक्षा दिली जाते? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी केला.
दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, कालपासून सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. राणा दाम्पत्य यांनी जी कृती केली, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. त्यात काहीच चूक नाही असं, दिलीप वळसे पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला, त्यानंतर आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले गेले, तेच गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्याची मागणी राणा दाम्पत्यांनी केली. यावरही परतिक्रिया व्यक्त करताना, दिलीप वळसे पाटील म्हणाले की, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्यातील आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सतत काही ना काही कारवाई सुरु आहे. हे सरकार राहिलं नाही पाहिजे, यासाठी जे क्लुप्त्या करायच्या त्या केल्या जात आहेत. हा त्याचाच एक भाग आहे. राणा दाम्पत्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, त्याशिवाय एवढं धाडस ते करू शकत नाहीत, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

