🕒 1 min read
अमरावती : हनुमान चालीसा हा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा डाव आहे, असेही बच्चू कडू म्हणाले. राणा दाम्पत्याला अमरावतीवरून मुंबईत येऊन हनुमान चालीसा म्हणण्याची गरजच काय ? भक्ती म्हणजे काय प्रदर्शन असते का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन मत मागितले. तेव्हा मस्जिद, बौद्ध विहारात गेले. काजीला आणले गेले. आता मात्र त्यांनी भूमिका बदलली आहे. आधी शिवसेना भाजप विरोधात मत मागितले. आता भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत आणि शिवसेनेला बदनाम करत आहेत. राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. पण याचे परिणाम राणा यांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील.
कोठडीत असताना हीन वागणूक दिली, असा आरोप नवनीत राणा यांनी म्हंटले होते. यावर बच्चू कडू म्हणाले, राणा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेलं बुजगावणं आहे. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमतं. जेल मध्ये काय पंचतारांकित व्यवस्था मिळणार का? जे सामान्य कैद्यांना, ते राणांना मिळणार. राणा यांना जेल मध्ये जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठवू, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन राणा यांनी प्रचार केला होता. शिवसेना – भाजप यांच्याविरोधात मत मागितले आता भाजपच्या खेम्यात गेले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मदत मागत आहेत. नवनीत या चांगल्या कलाकारी करतात. मात्र आता ही कलाकारी त्यांना महागात पडली आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
