मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकाने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता या दोन्ही संघांमधील (IND vs SA) कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या मैदानात खूप धावा केल्या जातील आणि हे मैदान गोलंदाजीसाठी अतिशय धोकादायक असल्याचे त्याने म्हटले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना १२ जूनला कटक येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता.
या मैदानावर खूप धावा होतील
भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या टी-२० सामन्याबाबत त्याने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “माझा पहिला अंदाज आहे की, इशान किशन आणि हार्दिक पंड्या दोघे मिळून ७५ पेक्षा जास्त धावा करतील. या मैदानावर खूप धावा केल्या जातात. हे एक गोलंदाजीसाठी अतिशय धोकादायक मैदान आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना संघाला विजयासाठी कमीत कमी १९५ धावा कराव्या लागतील. जर तुम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर तुम्हाला २०० चा टप्पा पार करावाच लागेल. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर हे दोघे मिळून दक्षिण आफ्रिकेसाठी ७५ पेक्षा जास्त धावा करतील. डी कॉक पहिल्या सामन्यात जास्त धावा करू शकला नाही पण या सामन्यात तो शानदार फलंदाजी करेल.”
भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७ गडी राखून मात केली होती. प्रथम खेळताना भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांची मोठी मजल मारली होती. मात्र प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकन संघाने १९.१ व्या षटकात ३ गडी गमावून लक्ष्य गाठले होते. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. जवळपास सर्वच गोलंदाज महागडे ठरले. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ १-० ने पुढे असून भारतीय संघाला आज होणारा दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे.
महत्वाच्या बातम्या:


