🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेली ५ टी-२० मालिका निर्णायक वळणावर उभी आहे. या सामन्यात झालेली चूक कोणत्याही संघाला महागात पडू शकते. या चुकांमुळे मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. अशा स्थितीत अंतिम सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने आफ्रिकेवर पलटवार करत दमदार विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे या निर्णायक सामन्यात जड भासत आहे. तर पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका संघ मात्र गडबड अलेला दिसत आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या संपूर्ण मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र ठरला आहे.
पहिला सामना सोडला तर भुवनेश्वरने संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली आहे. विशेषत: पॉवरप्लेमध्ये त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना बांधून ठेवले आहे. अशा स्थितीत भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मालिका घरच्या मैदानावर जिंकायची असेल, तर भुवनेश्वरला शेवटच्या टी-२० मध्ये आपली छाप सोडावी लागेल. या मालिकेतील भुवनेश्वरची कामगिरी भारतीय संघाच्या मालिका विजयाच्या आशा वाढवणारी आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत मालिकेतील ४ टी-२० सामन्यांमध्ये १४.१६ च्या सरासरीने ६ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने अतिशय किफायतशीर गोलंदाजीही केली आहे. त्याच्या इकॉनॉमी ६.७ असा राहिला आहे. या मालिकेत त्याने एका डावात ४ बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. या मालिकेत फक्त हर्षल पटेलने त्याच्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. पटेलने ४ सामन्यात १२.५७ च्या सरासरीने ७ गडी बाद केले आहेत.
भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये ४ गडी बाद केले
भुवनेश्वर संपूर्ण मालिकेत प्रभावी गोलंदाज ठरला आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांमध्ये त्याची गोलंदाजी अतुलनीय ठरली आहे. याच षटकांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे सर्वाधिक वेळा संकटात आणले आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने आतापर्यंत ५४ चेंडू टाकले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ३२ धावा दिल्या आहेत आणि ४ बळी मिळविण्यात तो यशस्वी ठरला आहे. पॉवरप्लेमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ३.५५ असा अविश्वसनीय राहिला आहे. तो मालिकेत भारतीय संघासाठी ‘ब्रह्मास्त्र’ ठरला आहे.
भुवनेश्वरला इतिहास रचण्यासाठी १ बळी
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या विश्वविक्रमापासून भुवनेश्वर एक बळी दूर आहे. जर त्याने बंगळुरूमध्ये पहिल्या ६ षटकांत आणखी १ बळी घेतला तर तो पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. सध्या या बाबतीत तो वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडच्या टीम साऊदीच्या बरोबरीत आहे. तिघांनीही पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत ३३ बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
