🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाईल. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणार असून घंटा वाजवून सामन्याला सुरूवात करणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डनप्रमाणे बाराबतीमध्येही घंटा वाजवली जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामन्याला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणार आसाल्याचे वृत्त समजल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्टेडियमचा आढावा घेतला.
हा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सचिव व्ही.के.पांडियन उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसूर होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अशा परिस्थितीत आरडीसी सुरेश कुमार रानई, पोलीस डीजी सुनील कुमार बन्सल, पोलीस आयुक्त सोमेंद्र प्रियदर्शी, कटक डीसीपी पिनाक मिश्रा, कटकचे जिल्हाधिकारी भवानी शंकर छायानी, कटक महानगरपालिकेच्या आयुक्त अनन्या दास, ओसीए सचिव संजय बेहेरा यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. बारबती स्टेडियममध्ये मुख्यमंत्री आणि सचिव यांना स्वतंत्र व्यवस्था कोणती असेल, यावरही सविस्तर चर्चा झाली असून बारबती स्टेडियमच्या सर्व व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला आहे.
या सामन्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंना हॉटेलमधून स्टेडियमपर्यंत आणण्याची जबाबदारी भुवनेश्वर पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. मालिकेतील दुसरा सामना १२ जूनला सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून दुपारी ३ वाजता चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. प्रेक्षकांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीत खेळला गेला होता. ज्यामध्ये भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव झाला होता. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारताने २११ धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने ३ गडी गमावत २१२ धावा केल्या आणि सामना जिंकला. दिल्ली येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे कटक येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
