पुणे : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले. तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालानंतर विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काही लोकांना ईडीची भीती दाखविली तर काही लोकांना वेगळी ताकद देवून मत परिवर्तन केले. संजय पवार यांना पहिल्या नंबरची मत होती. जी आकडेवारी पाहिजे होती, त्या आकडेवारीमध्ये कमतरता आली”, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, “अपेक्षित आकडा पाहिजे होता, तिथे कमी पडलो. या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मात्र यामध्ये काही राहिले तर काही आपल्यापासून दूर गेले याचा अभ्यास करण्याची गरज आहे.”
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. साधारणत: राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांनी परावभ पचवाव लागला.
महत्वाच्या बातम्या :


