मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयपीएल २०२२ चा सीझन रियान परागसाठी काही खास राहिला नाही. परागने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने कोणत्याही हंगामात २०० धावांचा टप्पाही गाठलेला नाही. यंदाच्या हंगामातही परागने १७ सामन्यात १६.६४ च्या सरासरीने १८३ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने परागवर पूर्ण विश्वास दाखवला आणि त्याला सर्व १७ सामने खेळवले. मात्र रियान परागच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा पाहायला मिळाली नाही.
१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल म्हणाले की, ‘रियान पराग या युवा फलंदाजाला अनेक संधी मिळूनही आपल्या कामगिरीत कोणतीही सुधारणा त्याने केली नाही. राजस्थानने त्याला सलग प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी दिली.’
स्पोर्ट्स टाकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मदन लाल म्हणाले, ‘रियान परागने यंदाच्या हंगामात राजस्थान संघाकडून सर्व सामने खेळले आहेत. मात्र त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली दिसली नाही. जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता…तो खेळ बदलू शकेल इतका मोठा खेळाडू नाही. आत्तापर्यंत प्रत्येक आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी सुधारणा दाखवली आहे पण या खेळाडूला (पराग) अनेक संधी मिळूनही सुधारणा झालेली नाही.’
७१ वर्षीय मदन लाल पुढे म्हणाले की, ‘राजस्थानसाठी रियान पराग ज्या स्थानावर फलंदाजी करतो तो टी-२० क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे कारण तिथे तुम्हाला वेगवान धावा करून संघाची धावसंख्या वाढवावी लागते. पराग या क्रमांकावर धावा करू शकला नाही, तर त्याच्यासाठी अडचणी वाढणार आहेत.’
मदन लालच नाही तर अनेक दिग्गज खेळाडूंनीही याआधी रियान परागवर टीका केली आहे. आयपीएल २०२२ मधील एका सामन्यादरम्यान हरभजन सिंगने परागच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पुढच्या सामन्यात परागने अर्धशतक झळकावले असले तरी या अर्धशतकी खेळीनंतर परागला संपूर्ण हंगामात एकही मोठी खेळी खेळता आली नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

