🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मांडलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कता बाळगून काही ठिकाणी कारवाई केली होती. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहित आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून थेट इशारा दिला आहे.
“सरकारला माझं एकच सांगणं आहे की, राज्य सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
पत्रात नेमकं काय ?
सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरु करण्यापूर्वी ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजोरोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं, कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनअधिककृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!
गेला आठवडा महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे हे पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपडक मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत जणू, ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

