🕒 1 min read
पुणे : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पदार्पणाचा आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाका केला आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील स्पर्धेच्या ५७व्या सामन्यात (LSG vs GT) लखनऊ सुपर जायंट्सचा सुपडा साफ करत गुजरात प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. स्पर्धेत सलग होणाऱ्या सामन्यांमुळे संथ होत चाललेल्या खेळपट्टीचा अंदाज घेत हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राशिद खानचे ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे गुजरातने लखनऊचा डाव फक्त ८२ धावांवर संपुष्टात आणला आणि ६२ धावांनी विजय नावावर केला. या विजयासह गुजरात १८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
लखनऊचा डाव
गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. वेगवान गोलंदाज यश दयालने सलामीवीर क्विंटन डी कॉकला (११) तर मोहम्मद शमीने कप्तान केएल राहुलला (८) बाद करत मोठे धक्के दिले. पदार्पणवीर करण शर्मा (४), कृणाल पंड्या (५), आयुष बदोनी (८) हेसुद्धा संथ खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. मार्कस स्टॉइनिस (२) धावबाद झाला, तर जेसन होल्डरला (१) राशिद खानने पायचीत पकडले. एका बाजूने किल्ला लढवत असलेला दीपक हुडा राशिद खानने टाकलेल्या १४व्या षटकात बाद झाला आणि लखनऊच्या विजयाच्या आशा मावळल्या. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर राशिदने आवेश खानला झेलबाद केले आणि लखनऊला ८२ धावांवप थोपवले. राशिदने २४ धावांत ४ बळी घेतले. पदार्पणवीर साई किशोरने ७ धावांत २ बळी घेतले.
Playoffs, #AavaDe????#SeasonOfFirsts #AavaDe #LSGvGT pic.twitter.com/DLgXCjgB63
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022
गुजरातचा डाव
शुबमन गिलसोबत सलामीला आलेल्या वृद्धिमान साहाला गुजरातसाठी चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज मोहसीन खानने साहाला (५) फसवले. त्यानंतर आवेश खानने मॅथ्यू वेड (१०) आणि कप्तान हार्दिक पंड्याला (११) तंबूचा मार्ग दाखवला डेव्हि़ड मिलरने संथ २६ धावा केल्या. शुबमनने अर्धशतक साजरे केले, पण तोही मोठी फटकेबाजी करू शकला नाही. राहुल तेवतियाने नाबाद २२ धावा करत गुजरातला दीडशे धावांच्या जवळ पोहोचवले. गिलने ७ चौकारांसह नाबाद ६३ धावा केल्या. २० षटकात गुजरातने ४ बाद १४४ धावा केल्या. या सामन्यात गुजरातने फलंदाजीदरम्यान फक्त एक षटकार ठोकला.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, करण शर्मा, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, मोहसीन खान.
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
