🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने आज (बुधवार) मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने हिरवी झेंडी दिली आहे. तसेच उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशिव’ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक होत मंत्रिमंडळाचे आभार मानले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही मला अडीच वर्षे साथ दिली. धन्यवाद या अडीच वर्षात माझ्याकडून चूक झाली, कोणाचा अपमान झाला असेल तर मला माफ करा. माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली. ज्या खात्याचे निर्णय राहीलेले आहेत. ते पुढच्या कॅबीनेटमध्ये आपण घेऊ”
राज्यपालांनी गुरुवारी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले असताना महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतले आहेत. मात्र, शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात आल्यास उद्धव ठाकरेंना खुर्ची गमवावी लागू शकते.
शिंदे यांचा दावा
मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे जवळपास 39 आमदार त्यांच्या गटात आहेत. अपक्षांसह आपल्याकडे ५० आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. आजही आम्हाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
