🕒 1 min read
मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारचं कौतुक केलं आहे. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि या सरकारकडून चांगली काम येत्या काळात होतील असा विश्वास देखील आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये कुणाला कोणतं खातं मिळणार याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. ११ जुलैला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर खातेवाटप होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आपल्याला सामाजिक न्याय खातं, त्यातून अपंग कल्याण मंत्रालय वेगळं काढावं आणि अमरावतीचं पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र ही इच्छा व्यक्त करत असताना आपल्याला जे मिळेल त्यात समाधानी असू असे देखील त्यांनी सांगितले आहे.
बच्चू कडू मंत्री पदासाठी शिंदे सरकारच्या बाजूने गेल्याचे विरोधकांकडून सांगितलं जात होतं. यावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं. मंत्रीपदासाठी किंवा पैशासाठी गेले हे चुकीचं आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. माझा विषय अपंग बांधवांचा आहे. अपंगांसाठी राज्यभरात शंभर गुन्हे दाखल आहेत. ३२ शासन निर्णय काढले. देशात अपंगांसाठी सर्वाधिक निधी महाराष्ट्रात मिळतोय. १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी आमच्या आंदोलनानंतर झाली. असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.
त्याबरोबरच सामाजिक न्याय या खात्यात एकतर अपंग कल्याण खात वेगळं काढावं आणि ते पद ही आम्हाला मिळावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जो घटक दुर्लक्षित आहे, ज्याचा भाऊ त्याच्याकडे पाहत नाही त्याची सेवा करण्याचं काम आम्हाला दिलं तर आम्ही त्यामध्ये धन्यता मानू. ज्याचं बजेट जास्त ते खातं मोठं असं आम्ही समजत नाही. ज्यामध्ये सेवा करण्याची अधिक जास्त संधी आहे, अनेकांचे अश्रू पुसता येतील हे जरी दिलं तरी आमची काही मागणी नाही, आग्रह नाही असं बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
