मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री वेगळी असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री ही तीन माळ्यांची होती तर उद्धव ठाकरेंची मातोश्री ही आठ माळ्यांची असल्याचं भरत गोगवले यावेळी म्हणाले आहेत. हे आठ मजले आम्ही चढूच शकत नाहीत अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेसारखी राहिलेली नसल्याचं सांगत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आजच्या शिवसेनेतील कारवाया या फक्त संजय राऊत यांच्या मार्फतच केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याबरोबच त्यांच्यावर कुणाचा वचक राहीला नसल्याचं गोगावले यावेळी म्हणाले.
भरत गोगावले म्हणाले कि, संजय राऊत काय बोलतात त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राठोडांनी सांगितलं त्यात काही चूक नाही. राऊतांमुळे बंडखोरीची वेळ आली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बराचसा अवधी दिला होता. आम्ही वाट पाहत होतो. पण हे आमच्या लोकांची पदे काढून घेत होते. राऊतांची विधाने काळजाला घरं पाडणारी होती. काळजाला चरे पडत होते. नार्वेकरांना चर्चेला पाठवत होते आणि दुसरीकडे पदे काढून घेतली जात होती. तर राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला मजबुरीने हालचाली सुरू कराव्या लागल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान , उद्धव ठाकरे यांनी प्रति मातोश्री उभी केली असल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. बाळसाहेबांची तीन माळ्यांची मातोश्री आम्ही चढू शकतो. उद्धव ठाकरे यांची आठ माळ्यांची मातोश्री आम्ही चढूच शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

