🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील पाचवा कसोटी सामना पूर्ण झाला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात पहिले तीन दिवस इंग्लिश संघावर पकड घट्ट करणारा भारतीय संघ चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमकुवत पडला. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेणारा भारत दुसऱ्या डावात २४५ धावांत आटोपला. भारतासाठी दुसऱ्या डावात फक्त चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हे इंग्लिश गोलंदाजांचा काही काळ सामना करू शकले. त्याचवेळी भारताने दुसऱ्या डावात दिलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लिश संघाने सहज गाठून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. संघासाठी, माजी कर्णधार जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) यांनी मधल्या फळीत सुरेख खेळी खेळली.
एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर देशातील माजी खेळाडू भारतीय खेळाडूंच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रूट आणि बेअरस्टो यांच्यासमोर भारतीय संघाने परिस्थिती आणखी कठीण करायला हवी होती, असे माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. या दोन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर धावांसाठी संघर्ष करावा लागतो, असे सामन्यादरम्यान कधीच वाटले नव्हते.
असा पराभव हा संघ म्हणून हृदयद्रावक पराभव असल्याचे मत माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने व्यक्त केले. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, ”जेव्हा समोर दोन फलंदाज आहेत ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे आणि ते उत्कृष्ट दर्जाचे आहेत तेव्हा ही लाजिरवाणी गोष्ट नाही. इंग्लंडने जेवढ्या मेहनतीने हे काम केले, तेवढ्या सहजतेने पूर्ण केले. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे.”
आगरकरने भारतासाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भाग घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५८, एकदिवसीय सामन्यात २८८ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबतच त्याने देशासाठी फलंदाजीतही योगदान दिले आहे. आगरकरने कसोटी क्रिकेटमध्ये ५७१, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२६९ आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
