मुंबई : राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर काही आमदारांनी शिवसेनेत मोठा बंड पुकारला. या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पडले व एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवून नवे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता प्रश्न उपस्थित झालाय तो सरकारच्या मंत्रिमंडळाचा. कारण आता कोणत्या नेत्याला किती आणि कोणते पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर आता जनरेला लवकरच मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता लवकरच कुणाला मंत्रिपद आणि कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी सुरू केली होती आणि पक्षाच्या बहुतांश आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती. यावेळी सर्वांना वाटत होते की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपने वेगळी खेळी खेळत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यानंतर फडणवीस यांनी मी सरकारच्या बाहेर राहणार असल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांच्या धक्कादायक घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होणार याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला १४ ते १५ तर भाजपच्या वाट्याला २६ ते २७ मंत्रिपद येतील. अशा पद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरविकास आणि एमएसआरडीसी ही महत्त्वाची खाते शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खाते होते. आताही ही दोन्ही खाती शिंदे गटाकडेच ठेवली जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपकडे गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती घेतली जातील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे शिंदे गटातील किती बंडखोर आमदारांना मंत्रिपदे मिळतील याबाबतही विचारपूर्वक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
शिंदे घाटातील अपक्ष आमदारांना मिळू शकतात मंत्री पद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चितच आहे. मात्र कोणते पद मिळणारे हे अजून स्पष्ट नाही. याबाबत बच्चू कडूंनी स्वतः सामाजिक खात्याचा मंत्रीपद मिळण्याची ही इच्छा व्यक्त केली आहे. तर याच पदासाठी दुसरीकडे संजय शिरसाठ यांनीही साद घातली आहे. तसेच शिंदे गटातील आशिष जयस्वाल यांना ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

