मुंबई: हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ ऑस्कर २०२२च्या दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे चर्चेत आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि स्टेजवरच त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचाच शिवसेना खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी थेट महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध जोडला आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू असतानाच त्या मंचावर आणखी एक नाट्य घडले. सुपरस्टार विल स्मिथने ‘अँकर’ क्रिस रॉकच्या सणसणीत कानाशिलात लगावली. या ‘थप्पड’ची गुंज म्हणे जगभरात ऐकू आली. चित्रपट किंवा नाट्य कलाकार कितीही मोठे असोत, पण ते लेखकाने लिहून दिलेले संवादच पडद्यावर बोलत असतात आणि दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार अभिनय करीत असतात, पण ऑस्कर पुरस्काराच्या आंतरराष्ट्रीय मंचावर कानशिलात लगावण्याचे जे नाट्य घडले ते अनपेक्षित होते. ते नाट्य होते की सत्य होते हे क्षणभर रसिक प्रेक्षकांना कळलेच नाही. काहीजण ते दृश्य पाहून अवाक् झाले. काहींनी टाळ्या वाजवल्या तर काहींना वाटले, हा तो मंच नाही. येथे असे घडायला नको होते, पण सुपरस्टार विल स्मिथच्या संयमाचा बांध तुटला व त्याच्याकडून हे कृत्य घडले असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानफटात मारण्याआधी दोन दिवस पाटण्यात एका माथेफिरूने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कानफटात मारण्याचा प्रयत्न केला. हा काही अतिरेकी किंवा दहशतवादी हल्ला नव्हता, पण ज्याने नितीश कुमारांच्या बाबतीत हे कृत्य केले त्यास माथेफिरू ठरवून जग मोकळे झाले. शरद पवारांपासून अनेक नेत्यांपर्यंत असे प्रसंग सार्वजनिक कार्यक्रमांत ओढवले आहेत. पंडित नेहरूंनाही स्वातंत्र्यानंतर फाळणीतील निर्वासितांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे, पण ‘ऑस्कर’च्या मंचावर घडलेल्या कृत्याचे वर्णन एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे क्रिस रॉकने बोलण्यातला ताळतंत्र सोडला. भावना दुखावल्या म्हणून विल स्मिथचा संयम सुटला व त्याने कानशिलात लगावली. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
क्रिस रॉक हा स्टेजवर डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी आला होता. या वेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जेडा स्मिथ हिच्यावर एक ‘हलकी’ कॉमेंट केली. ‘जी. आय. जेन – २’ या चित्रपटाबाबत बोलताना रॉक याने स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. जेडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट करताच विल भडकला व त्याने स्टेजवर चढून रॉकच्या कानाखाली मारली. मुळात जेडा ही अॅलोपेसिया नावाच्या आजाराने त्रस्त असून त्यामुळे तिच्या डोक्यावरचे केस कमी होत आहेत. त्यामुळे त्यावरून रॉक याने केलेली मस्करी विल याला असह्य झाली आणि त्याने एखाद्या विद्रोही शिवसैनिकाप्रमाणे क्रिस रॉकवर हल्ला केला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स
मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

