नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षांनी केल्यानंतर राजकारण तापले आहे. मशिदीतील व्हायरल व्हिडिओवरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण प्रकरणावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली. भागवत यांनी या संपूर्ण प्रकरणावर परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
“काही ठिकाणांबद्दल आम्हाला विशेष आदर होता आणि आम्ही त्याबद्दल बोललो. पण रोज नवीन प्रकरण आणू नये. आम्ही वाद का वाढवायचा? आमचा ज्ञानवापींवर विश्वास आहे. पण प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे?”, असा प्रश्न मोहन भागवत यांनी उपस्थित केला.
हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत की नाही हे तपासण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम याचिकाकर्ते न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीच्या आवारातील व्हिडिओवरुन कायदेशीर लढा देत आहेत. दुसरीकडे, हिंदू याचिकाकर्त्यांनी मशिदीत शिवलिंग असल्याचा दावा केला आहे.
इस्लाम बाहेरून आले-
मोहन भागवत यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “सध्या ज्ञानवापीचा मुद्दा सुरू आहे. एक इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही. ना आजच्या हिंदू लोकांनी तो बनवला, ना आजच्या मुसलमान लोकांनी बनवला. त्यावेळी तो इतिहास घडला. आम्ही काही खास प्रतिकात्मक ठिकाणांबद्दल भूमिका घेतली. पण रोज एक केस वर काढता कामा नये. आम्हाला भांडण वाढवायचे नाही. ते म्हणाले की इस्लाम बाहेरून आले, आक्रमकांच्या माध्यमातून ते आले. त्यावेळी ज्यांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांनी देवस्थाने पाडली.”
आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते-
भागवत म्हणाले की, “हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाहीत. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते. मनात काही मुद्दे असतील तर ते निर्माण होतील. ते कोणाच्या विरोधात नाही. परस्पर संमतीने मार्ग काढा. मार्ग न मिळाल्यास लोक न्यायालयात धाव घेतात. काहीही झाले तरी न्यायालयाचा निर्णय मान्य करायला हवा. आपली न्यायव्यवस्था पवित्र आणि सर्वोच्च मानून आपण निर्णयांचे पालन केले पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

