🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं. शिवसेनेतून अनेक आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. या सत्तानाट्याचा शेवट म्हणजे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. बंडखोर शिवसेना आमदार आणि भाजपच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
खरंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत होतं. पण त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
त्याबरोबरच एकनाथ शिंदे गटाकडून शिंदे गट हाच शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक असल्याचा दावा केला जात होता. देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सच्चे शिवसैनिक कोण आहेत याचे सर्टिफिकेट आम्हाला देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
“आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे. या आगीशी खेळू नका” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी फडणवीस यांना दिला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील जोरदार टीका केली. “आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय त्यांना लखलाभ ठरो. आजही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेले शिवसैनिक हे विधानसभेचे अध्यक्ष पदापर्यंत बसवण्यासाठी लागतात. यातूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्व आधारित होत आहे” असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
