🕒 1 min read
मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रक काढून त्याद्वारे देण्यात आली आहे. आढळराव पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षातील महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात बऱ्याच अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विविध स्तरावरतून मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये कुठेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो किंवा नावाचा उल्लेखही केलेला नाही.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@ShivajiAdhalrao) July 1, 2022
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला बळकट करण्यात आढळराव पाटलांचा मोठा वाटा राहिला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना पक्षातील मोठे नेते मानले जातात. त्यांनी २००४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २००० आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी १५ वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. या पराभवानंतर आढळराव पाटलांचे नाव हे मोठ्या प्रमाणात झाकले गेले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
