🕒 1 min read
हिंगोली : आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ते एका हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करत मारताना दिसत आहेत. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी त्यांचे समर्थन केले तर काहींनी बांगर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यातच आता त्या व्यवस्थापकाने समोर येत स्पष्टीकरण दिले असून त्यांनी बांगर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या उपहागृह व्यवस्थापकाचे नाव शुभम हरण असे आहे. शुभम यांनी सांगितले कि, “सकाळची वेळ होती, आम्ही शिल्लक राहिलेलं अन्न कचऱ्यात टाकण्यासाठी बाजूला काढून ठेवलं होतं. नेमके तेव्हाच संतोष बांगर साहेब हॉटेलमध्ये आले आणि तेच अन्न पाहून त्यांनी असे आरोप केले कि आम्ही निकृष्ट दर्जाचे अन्न कामगारांना पोहोचवत आहोत. मात्र तसं काही नाही. बांगर यांनी जे अन्न मीडियाला दाखवलं ते ‘वेस्टेज फूड’ होतं. तसंच ठरलेले मेन्यू दिले जात नाहीत असा आरोपही केला. मात्र आम्ही सगळं अन्न नीट देतो. आम्हाला अशी कुठलीही तक्रार आली नाही.” तसेच त्यांना झालेल्या मारहाणीवर बोलताना ते म्हणाले कि, “मला झालेली मारहाण महाराष्ट्राच्या जनतेने बघितली आहे. तसं होणं अपेक्षित नव्हतं मात्र ते झालंच. पण बांगर यांच्याविरोधात तक्रार देण्याचा कोणताही विचार नाही.” तर हे बोलत असतानाही शुभम यांच्या चेहऱ्यावरची हतबलता खूप काही सांगून जात होती.
बांगर म्हणतात, कायदा हातात घेणारच
तर या सगळ्या प्रकरणानंतर संतोष बांगर म्हणाले कि, “हॉटेलच्या किचनमध्ये खराब झालेली वांगी, कांदे, डाळी आणि भाज्या पाहिल्यावर मला ते सहनच झालं नाही. मला हे सगळं नवीन नाही. गोर गरिबांवर जर अन्याय होत असेल तर मी कायदा हातात घेणारच. मला कशाचीच पर्वा नाही ज्या गोर गरिबांनि मला निवडून दिलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम मी शिवसेनेच्या माध्यमातून करत राहणार. हे फक्त हिंगोलीतच नाही तर राज्यभर सुरु आहे. मला अनेक ठिकाणांहून फोन आले आहेत कि, तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. हिंगोलीच्या लोकसंख्येमध्ये आणि माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत पोचवल्या जाणाऱ्या डब्यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. याची चौकशी झाली पाहिजे. या विरोधात मी आवाज उठवणारच.”
महत्वाच्या बातम्या:
- Sameer Vankhede vs Nawab Malik | ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल; समीर वानखेडे आक्रमक
- Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन
- Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान
- Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी
- Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
