मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले. तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालानंतर विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ” घोडेबाजारातील घोड्यांमुळे सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, अपक्षांनी हरभरे खाल्ले आहेत. समोरच्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासली. घोडेबाजारात जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही.”
“संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार हे उत्तम रित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवत असतो, असंही ते म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील. राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेसचा देखील एक उमेदवार निवडून येईल. ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचं मत बाद केलं. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला होता. मात्र फक्त कांदें यांचे मत अवैध ठरवलं. रवी राणा यांनी देखील जे कृत्य होतं त्यांचही मत अवैध व्हायला हवं होतं”, असंही राऊत म्हणाले.
“इतर मतंही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला. आम्ही खबरदारी आधीही घेतली होती, आताही घेऊ, फक्त आम्ही घोडेबाजार केला नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


