🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशीच बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका शिवसेनेला तसेच महाविकास आघाडी सरकारला बसला आहे. अशातच आता भाजपचे नेते सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सर्व मिळून एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. भाजप सोबत युती पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि भाजप नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
“एकनाथ शिंदे यांचं हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावे” असं सुभाष साबणे यांनी म्हटलं आहे. आमदार एकनाथ शिंदे यांना दैवत संबोधत सुभाष साबणे यांनी महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत ठाण्यामध्ये सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू? पण उद्धव ठाकरे जी शिवसेनाप्रमुखांना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का?” असा खोचक सवाल सुभाष साबणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
