कोल्हापूर– शरद पवारांनी विधान परिषद आमदारकीची दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. राजू शेट्टी यांनी नुकतीच बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं होतं. आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीत राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित झाली आहे.
दरम्यान, आजपर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम मिळावा यासाठी गावागावात संघर्ष केला. ज्या बारामतीत राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला त्याच बारामतीत आमदारकीसाठी त्यांना शरण जावे लागले. राजू शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केली.
असा घणाघाती आरोप जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केला.
ज्या राष्ट्रवादी बरोबर आज पर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टीं सारख्या माणसाला जावे लागते. ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे. आमदारकी घ्यायची होती तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार करता आला असता. चळवळ वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता. परंतु केवळ सत्ता आणि सत्ता याच्याच मागे लागलेल्या शेट्टी यांना कार्यकर्त्याचा कोणतेच सोयरसुतक नाही. यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा घात करून गोविंद बागेत आमदारकी स्वीकारली आहे.
दरम्यान, शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारल्याने टीकेचे धनी बनले आहेत. फेसबुकवर भावनिक पोस्ट करत आता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया राजू शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलं आहे फेसबुक पोस्ट मध्ये .
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.
जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले.
तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव ङाॅ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे.
एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच… शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये. – राजू शेट्टी
राजू शेट्टींना विधानपरिषदेची ऑफर दिल्याने राष्ट्रवादीमध्ये उफाळला प्रचंड असंतोष
‘महाविकास आघाडीने शेट्टींना मुख्यमंत्री करावं, मी स्वतः त्यांची मिरवणूक काढेन’
राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव; राजू शेट्टींची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

