मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेते आणि विरोधी पक्षांचे नेते आमने-सामने आल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची देखील जोरदार चर्चा आहे. काल (सोमवार) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यावर थेट फोडाफोडीचा आरोप केला आहे. असे असतांनाच आता सोशल मीडियावर शिवसेनेच्या एका जुन्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या फेसबूक पेजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवार हे जरी मित्र असले तरी ती नीच प्रवृत्ती आहे, असे म्हणत टीका केली आहे. ही पोस्ट २०१२ ची असून पुन्हा एकदा या पोस्टमुळे शिवसेना-राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. राज्यात कधीकाळी कट्टर विरोधक असणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस यांचे राज्यात सरकार आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका बदल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. मात्र इतिहास पुसल्या जात नाही.
दरम्यान, इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा ही पोस्ट चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या व्हायरल पोस्टवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी शिवसेने त्यांचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुत्र्या तोंडाचे अजित पवार’ या शिर्षकाखाली त्यांनी अग्रलेख लिहला होता. मात्र राष्ट्रवादीसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिवसेनेने सामना डिजीटलवरून तो लेख डिलीट केला. मात्र, शिवसेना बाळासाहेबांचे वक्तव्य त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरुन डिलीट करेल का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे.
https://www.facebook.com/Shivsena/posts/10150583244932030
शिवसेना आणि राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण संबंध?
एकमेकांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीचे आता मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र शिवसेनेने सत्तेसाठी बदललेली भूमिका आज महाराष्ट्रासमोर आहे. त्यामुळे आता शरद पवार यांचे गुणगान गाणारी शिवसेना बाळासाबांचे वक्तव्य डीलीट करुन थेट बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद देणार का?, असा प्रश्न निर्माण होत आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
काल (सोमवार) राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे फोडाफोडी करत आहेत, असा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, असं देखील राजेश टोपे म्हणाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली.
जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना, आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, “जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगणार. भुमरे साहेब असतील किंवा सत्तार साहेब असतील यांना सांगणार की, सत्तेच्या जोरावर तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका.”
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीन पक्षात समन्वयाचा, सहकार्याचा अभाव आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमीच केली जाते. महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस वेळोवेळी बाहेर पडली आहे. आता खुद्द महाविकास आघाडीच्या आरोग्यमंत्र्याने आपल्या सहकारी मंत्र्यांवर फोडाफोडीचे आरोप केल्याने, आघाडीतील अंतर्गत विरोध चव्हाट्यावर आले आहे. यातूनच स्पष्ट होत आहे की, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

