‘विषाचे कडू घोट प्राशन करून सिंधुताईंनी अनाथांच्या आयुष्यात हसू फुलवलं’

मुंबई : ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे ४ जाने. रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे त्यांचे परवा निधन झाले. सिंधुताई यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’माय आणि लेकरू या दोन शब्दांभोवतीच आपलं अवघं आयुष्य खर्च करणारी हजारो ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी मन सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातलं, कुठल्याही जाती-धर्माचं अनाथ मूल आपल्या पदरात घेऊन त्याचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करणाऱ्या या माऊलीच्या जाण्याने तिने सांभाळलेली हजारो मुले आज खऱ्या अर्थाने अनाथ झाली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका छोटय़ा शस्त्र्ाक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने ही कनवाळू आई कायमची शांत झाली. रक्ताच्या नात्याची प्रत्येक आई आपल्या मुला-बाळांचा सांभाळ, कोडकौतुक, काळजी सारं काही करतेच, पण सिंधुताई नावाच्या आईचं हृदय इतकं विशाल की, तिने जेवढी म्हणून अनाथ मुलं पदरात घेतली, त्यांच्या डोक्यावर आई बनून मायेची सावली तर धरलीच, पण अशी कितीही अनाथ मुले तिच्या छायेखाली धावत आली तर त्यांनाही आपल्या आश्रमात आणि हृदयात सामावून घेणारे एक अद्भूत आणि विलक्षण असे हे मातृतीर्थ होते.’

दरम्यान, जन्मापासून पाचवीला पुजलेला संघर्ष, अतोनात संकटांची मालिका, पण तशाही परिस्थितीत भक्कमपणे पाय रोवून, कधी याचक बनून, कधी साक्षात दुर्गेचा अवतार धारण करून महाराष्ट्राची ही लाडकी माई आयुष्याच्या होमकुंडातील निखारे पचवत स्वतः तर उभी राहिलीच, शिवाय हजारो अनाथ मुलांची आई झाली. जिथे स्वतःच्याच खाण्याची आणि जगण्याची भ्रांत तिथे दत्तक घेतलेल्या हजारो मुला-मुलींची आई होणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांना उत्तम शिक्षण देणं आणि त्यांची लग्ने लावून देण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडणं, हे येऱ्या-गबाळ्याचे काम नव्हते. मात्र, सिंधुताईंनी विषाचे कडू घोट प्राशन करून अगदी हसत-खेळत अनाथांच्या आयुष्यात हसू फुलविण्याचे अलौकिक कार्य पार पाडले, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: