मनसेच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पहिले आंदोलन; मात्र माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे गायब?

औरंगाबाद:पाचशे चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून मालमत्ता करात माफी देण्यात आली आहे. याच धर्तीवर औरंगाबादेतही करमाफी व्हावी यासाठी बुधवारी (दि.५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरत जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. नवनियुक्त मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. मात्र या आंदोलनात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas Dashrathe) यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्य सरकारने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील मालमत्ताधारकांनाही पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कराला माफी मिळावी अशी मागणी औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली. औरंगाबादेतील गुंठेवारीतील घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्र्यांची पोकळ आश्वासने आम्हाला नकोत असा आक्रमक पवित्रा आज मनसेने घेतला. या आंदोलनात मनसेचे शहरातील जवळपास सर्वच मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे या ठिकाणी कुठेही दिसून आले नाही.

नेमके काय आहे प्रकरण?

राज ठाकरे डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकारिणीत अनेक महत्त्वाचे बदल केले. यामध्ये सर्वप्रथम दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया वरून या गोष्टीचा विरोध करण्यास सुरुवात केली. पक्ष बदनामीचे कारण देत दाशरथे समर्थकांना पक्षातून जवळपास हाकलण्यात आले. आता दाशरथेही भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र व्हिडिओ जारी करत दाशरथे यांनी मी पदासाठी लाचार होणारा, पदासाठी भांडणारा, कुठल्याही गटबाजी न करणारा असा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ज्यावेळी माझे पद काढण्यात आले होते. त्यावेळी मी जी भूमिका घेतली होती तिच भूमिका आजही आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. अशी माहिती दिली होती.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पहिले आंदोलन

यात खुल्या जागेसाठी प्रति चौरस प्रमाणे १३१८ रुपये आणि बांधकाम झालेल्या जागेसाठी अधिकच दोन टक्के शहर विकास शुल्क आकारले जात आहे. मात्र शहराचा अजून कुठलाही विकास झालेला नाही. त्यामुळे विकास शुल्काचा बोजा सामान्य नागरिकांवर टाकू नये. आदी मागण्यांसाठी आज मनसेने मनपा मुख्यालयासमोर हे आंदोलन केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, सतनाम सिंग गुल्हाटी, बिपीन नाईक, आशिष सुरडकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र दाशरथे या आंदोलनात दिसले नाही.

महत्त्वाच्या बातम्या