‘त्या’ घटनेवरून अमरिंदर सिंग यांनी केली पंजाब मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची काल पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. जिथे हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी अंतरावर होतं असा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान यावरूनच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मोदींचा ताफा ज्या ठिकाणी अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी अंतरावर होतं. हा पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट होता, अशी शंकाही भाजपने उपस्थित केली आहे. दरम्यान यावरच पंजाबचे मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानाच्या गैरसोईबद्दल माफी मागितली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या आजच्या दौऱ्यातील सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याची आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना या दौऱ्यामध्ये कोणताही धोका नव्हता. आज फिरोजपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींना (PM Modi) परतावं लागलं याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आदर करतो.

तसेच मला आज भटिंडा येथे पंतप्रधानांचे स्वागत करायचे होते मात्र, ज्यांना माझ्यासोबत यायचे होते त्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली. म्हणूनच, मी आज पंतप्रधानांना स्वीकारण्यासाठी गेलो नाही कारण मी कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या काहींच्या जवळच्या संपर्कात होतो. खराब हवामान आणि त्यांना होणारा विरोध यामुळे आम्ही त्यांना हा दौरा थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र मोदी यांनी अचानक मार्ग बदलल्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या: