🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर फेसबुक पोस्ट करत टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल लागोपाठ ३ ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आता रोहित पवार यांनी ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकारातील इंधन दरातील संपूर्ण आकडेवारी जाहीर करत, देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का?. जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022 आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. आता यावरूनच रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
रोहित पवार फेसबूक पोस्टद्वारे फडणविसांना म्हणाले, माननीय फडणवीस साहेब आपण सत्तेत असताना पेट्रोल-डिझेलवर जो VAT आकाराला जात होता तोच 25% – 21% स्लॅब आज आकारला जात आहे. राज्य सरकार आकारत असलेल्या सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या कार्यकाळात आकारल्या जात असलेल्या सेसपेक्षा आज आकारला जात असलेला सेस नक्कीच कमी आहे. आपण सत्तेत असताना पेट्रोलवर 11 रु सेस आकारला जात होता. 2014 पूर्वी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रति लिटर 1 रुपया आकारला जाणारा सेस 11 रु पर्यंत फडणवीस साहेब आपणच नेला होता.
डिझेलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज डिझेलवर केंद्राचा कर 22 रु आहे तर राज्याचा कर 20 रुपये आहे. त्यामुळं डिझेल दरवाढीसंदर्भात राज्याचा प्रश्नच येत नाही. पेट्रोलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्राचा कर 28 रु आणि राज्याचा कर 32 रु आहे. राज्य शासन टक्केवारीमध्ये vat आकारत असल्याने राज्याचा कर हा सध्याच्या स्थितीला जास्त दिसतो, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच राज्याचा कर आपोआप कमी होत असतो, याची माहिती फडणवीस साहेबांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी राज्यसरकारला कारणीभूत ठरवणे पूर्णतः चुकीचे आहे.
‘भाजप है तो मुनकीन है.’
युपीए सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 105 डॉलर्स प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत 78 रु प्रति लिटर होती. आज भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत 102 डॉलर्स प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत मात्र 120 रु प्रति लिटर आहे. भाजपा सरकारच्या काळात तर कच्च्या तेलाची किंमत 17 डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत घसरली होती, परंतु तेंव्हाही पेट्रोलची किंमत 80 रुपये प्रति लिटरच होती. युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत जास्त असताना पेट्रोलची किंमत कमी असायची आणि आज भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत कमी असताना पेट्रोलची किंमत मात्र जास्त आहे, हे विपरीतच नाही का? परंतु यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही, कारण… ‘भाजप है तो मुनकीन है.’, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.
रोहित पवार म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी कमी होत गेल्या. परंतु जसजशा कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तसतसे केंद्राने इंधनावरील कर वाढवले. 2014 पूर्वी केंद्र सरकार पेट्रोलवर 9 रु तर डिझेलवर 3 रू कर आकारत असे आणि आजचं भाजप सरकार पेट्रोलवर 28 रु तर डिझेलवर 22 रु कर आकारते.
2014 नंतर भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात तब्बल 12 वेळा वाढ करत पेट्रोलवरील कर 300 % तर डिझेलवरील कर 800 % वाढवला. युपीए सरकारच्या काळात केंद्राला इंधनावरील उत्पादन शुल्काच्या माध्यमातून वर्षाला 99 हजार कोटी प्राप्त होत होते. हीच रक्कम आज 4 लाख कोटीच्या घरात आहे. गेल्या तीन वर्षात केंद्राने उत्पादन शुल्काच्या माध्यमातून 8 लाख कोटी पेक्षा अधिक महसूल प्राप्त केल्याची कबुली खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच दिल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
राज्याने टॅक्स कमी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून नेहमीच केली जाते, यावर रोहित पवार म्हणाले, “ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी राज्य सरकार नक्कीच टॅक्स कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते. राज्य सरकारने सीएनजी वरील vat 13.5% वरून 3% पर्यंत खाली आणून किलोमागे 6 ते 7 रु कमी केले. परंतु दुसरीकडे केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसच्या किंमती दुपटीने वाढवल्या. गेल्या महिन्यात 2.90 डॉलर्स/मिलीयन BTU असलेली नैसर्गिक गॅसची किंमत केंद्र सरकारने 6.10 डॉलर्स/मिलियन BTU पर्यंत दुपटीने वाढवली. परिणामी सीएनजीचे दर 12 ते 15 रुपयांनी वाढले आहेत.”
रोहित पवार यांनी ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकारातील इंधन दरातील संपूर्ण आकडेवारी जाहीर केली, फडणवीसांना आपल्या सरकारच्या काळातील आकडेवारी नमूद करत, दोन्हीतील फरक लक्षात घेण्याचे आवाहन केले. सद्या या रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टची बरीच चर्चा होत आहे. या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

