🕒 1 min read
कोल्हापूर : टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आली आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्या आहेत. त्यावरून आता नेते सत्तारांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. आताच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
“सध्याचं सरकार त्यांचंच आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांना थेट शिक्षण मंत्री केलं जाईल. म्हणजे सगळा निकाल लागेल. पण या सगळ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. आम्ही विधानसभेत टीईटी घोटाळ्याविरोधात आवाज उठवणार आहोत. राज्यात मंत्रिमंडळ नसल्याने अस्थिरता आहे, त्यामुळे अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. मंत्री कोण होणार? सरकार कुणाला कोणतं खातं देणार? हेच लोक बघतात. त्यामुळे आता सरकार अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करेल”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तार यांना लगावला आहे.
सत्तार यांचे स्पष्टीकरण
माझ्या मुलींनी परीक्षा दिली होती मात्र त्या पात्रच झाल्या नाहीत मग त्यांची नावं या यादीच आलीच कशी? माझ्या मुली या माझ्याच संस्थेत २०१७ साली नोकरीला लागल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हि परीक्षा दिली होती मात्र त्यात त्या दोघीही अपात्र ठरल्या. त्याची प्रमाणपत्र देखील माझ्याकडे आहेत. त्याची कॉपी कुणाला हवी असल्यास मी देऊ शकतो. माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण खात्यातील कोणतीही माहिती कुणीही मिळवू शकतो. त्यामुळे जर माझ्या मुली त्यात दोषी आढळल्या तर कारवाई करावी, पण जर त्यांची यात काही चूक नसेल तर मात्र ज्यांनी हा बदनामीचा कट रचला आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही
- Kishori Pednekar | दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले
- TET Scam | “…तर त्यांना फासावर लटकवा”; टीईटी प्रकरणावर अब्दुल सत्तार संतप्त
- MNS on Eknath Shinde | “तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे…” ; मनसेची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
- NCP । ‘मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले!’

