Share

स्पर्धा परीक्षांसाठी दृढनिश्चय करणे गरजेचे – प्रवीण परदेशी

Published On: 

चंद्रपूर : पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रत्येकाने यशाचे सांगितलेले सूत्र, शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची यशकथा, उपस्थितांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळालेली थेट उत्तरे, यामुळे मिशन सेवा अंतर्गत जिल्हा प्रशासन, दीपस्तंभ फाउंडेशन, अरूण बोंगिरवार फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन सेमिनारला चंद्रपूरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनामार्फत सरकारी नोकरीमध्ये जिल्ह्यातील मुलांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी मिशन सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्राचे पंचविसावे मुख्य सचिव राहिलेले चंद्रपुरचे सुपुत्र अरुण बोंगिरवार यांच्या समाजकार्याला पुढे नेणारे अरूण बोंगिरवार फाउंडेशन कार्यरत आहे. समाजाचे सामाजिक ऋण फेडण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्य सर्वश्रुत आहे. या तिघांच्या मार्फत चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला अरुण बोंगिरवार यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता बोंगिरवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, छत्तीसगड येथील महिला व बालकल्याण विभागाचे सचिव सिद्धार्थ परदेशी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, बोंगिरवार परिवारातील सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा ही कठोर तपश्चर्या असून यासाठी दृढनिश्चय करणे गरजेचे असल्याचे यावेळी सर्व वक्त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन सेवा या उपक्रमाचे देखील यावेळी मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (भाप्रसे )यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षाबाबतच्या शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक देणगीचा सन्मान करावा, असा संदेश दिला. आपण कोण? कसे आहोत? कुठून आलोय? कसे दिसतो? काय कमी आहे? याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता केवळ आपल्या बुद्धिचातुर्याने स्पर्धा परीक्षा यशस्वी करता येते. हा आत्मविश्वास मनात बाळगणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. युपीएससी सारखे मोठे आव्हान घेण्याचे एकदा निश्चित झाले की मग अन्य आव्हाने छोटी वाटतात. त्यामुळे स्वतःला पूर्णतः ओळखून मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे. त्यामुळे वैयक्तिक क्षमता वृत्तीत वाढ होते, असे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

छत्तीसगड प्रशासनात सचिव म्हणून काम करणारे सिद्धार्थ परदेशी यांनी यावेळी आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तुमचा आत्मविश्वास व तुम्ही निवडलेले क्षेत्र तुम्हाला यश मिळवून देते. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय ठेवावी. अशा विचारांचीच आजूबाजूला गर्दी असावी, आणि दर्जेदार अभ्यासाची गोडी लावून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनात सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉक्टर, इंजिनियर व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आयएएस बनण्यासाठी प्रयत्न का करतात हे कोडे सोडवून दाखविले. ते म्हणाले, सामाजिक भान आणि वैविध्यपूर्ण व आव्हानात्मक करियर निवडायची आवड, तशी वृत्ती व ती धडपड असणाऱ्या प्रत्येकाला सनदी अधिकारी बनण्याची तळमळ असते. त्यामुळे गुणवान, मात्र आव्हान स्वीकारण्याची ताकद असणारे या क्षेत्रात येत असतात. यावेळी त्यांनी आयएएस होताना आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेली मात. याबाबतचे मार्गदर्शन केले. आयुष्यात केवळ स्वतःची स्पर्धा करा आणि विचारात वेळ घालविण्यापेक्षा छोटीशी सुरुवात करा,असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आयएएस होण्यासाठी आपल्या गरीब परिस्थितीचा बाऊ न करता मोठ्या शहरात राहण्याची व अभ्यासाची व्यवस्था व्हावी यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देऊन शासनामार्फत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या सोयींचा कसा उपयोग करून घेतला याची धडपड विद्यार्थ्यां पुढे मांडली.दहा बाय दहाच्या रूम मध्ये दहा-बारा लोकांनी अभ्यास केल्यानंतर देखील त्या रूम मधून दोन आयएएस अधिकारी कसे तयार झालेत याचा रोमहर्षक प्रवास मांडला. यशदा व अन्य ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण व त्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर असा केलेला प्रवास विद्यार्थ्यांना थक्क करून गेला.

चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एमबीबीएस फायनलला असतानाच केवळ खाकीवर्दी घालायची त्या महत्त्वाकांक्षेपोटी चार वेळा परीक्षा देऊन कशा पद्धतीने आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले… हा प्रवास विद्यार्थ्यां पुढे मांडला. मध्यमवर्ग कुटुंबात अशावेळी सर्वांना पडणारी भीती म्हणजे करिअरचे काय होणार? अशावेळी कुटुंबाने कसे पाठीशी राहावे याचे उदाहरणही सादर केले. आंध्र प्रदेशातील कडप्पा परिसरातील सामाजिक वातावरणातून त्यांना समाजामध्ये खाकी वर्दीच्या माध्यमातून उत्तम वातावरण तयार करण्याचे स्वप्न आयपीएस होऊन पुर्ण करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यजुवेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पियुष बोंगीरवार यांनी केले. यावेळी मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख अभ्यासिकाना पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील विविध स्पर्धा परीक्षा अकादमी तसेच जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षक इच्छुक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रियदर्शिनी हॉलच्या बाहेर हे मार्गदर्शन ऐकता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!