मुंबई: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. आज दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. या निवडणुकांची घोषणा झाल्यापासूनच पूर्ण देशाचे लक्ष हे उत्तर प्रदेशवर लागलेले होते. सध्या युपीमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद देखील भाजपकडे राहणार असल्याची शक्यता आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर
दिल्लीतल्या कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाला. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही. ते उत्तर प्रदेशात एकटे लढले आहेत. तिथे जी मत त्यांना पडलीत त्याचा त्यांनी सकारात्मक विचार करावा, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाचा स्वीकार करतील. परंतु आता मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु, असे पवार म्हणाले. तसेच लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.