मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्येच या युवा कर्णधारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारताने दोन्ही सामने गमावल्याने आता दिग्गज खेळाडू कर्णधार पंतबद्दल वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत. याबाबत भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरनेही आपले मत व्यक्त केले आहे. जाफरच्या म्हणण्यानुसार, कर्णधार म्हणून पंतला त्याच्या मानसिक पैलूत खूप सुधारणा करण्याची गरज आहे. जाफरचा विश्वास आहे की पंत कठीण परिस्थितीत दडपणाखाली जातो परंतु अनुभवाने तो सुधारेल. कटक येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेने १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने आता ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर वसीम जाफरने ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. पहिल्या सामन्यात पंतला चहलचा वापर व्यवस्थित करता आला नाही तर तर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असूनही तो फिरकीपटूंवर अधिक अवलंबून दिसला.
कर्णधारपदाच्या अनुभवाने पंतमध्ये सुधारणा होईल
ईएसपीएन क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान, जाफरला विचारण्यात आले की पंत आपल्या योजना आणि रणनीती सहजपणे बदलतो का? यावर जाफर म्हणाला की, “होय, आयपीएलमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. मला वाटते की तो जितका कर्णधारपदाचा अनुभव घेईल तितका तो चांगला होईल. पण हो, या क्षणी मला वाटते की सामना चुरशीचा असताना तो थोडा घाबरतो.” आयपीएल २०२२ मध्ये ऋषभ पंत अनेक प्रसंगी दबावाखाली दिसला आहे. त्याच्या प्रमुख गोलंदाजाने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला पूर्ण षटके मिळाली नाहीत. तर आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यातही तो डीआरएसच्या बाबतीत गोंधळलेला दिसला. फलंदाज झेलबाद होऊनही त्याने डीआरएसचा वापर केला नव्हता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला आणि दुसर्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघातील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळायला जाणार आहे. दोन्ही सामन्यात पराभूत झालेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. मागील दोन सामने पाहता भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:


