पतीने पाटबंधारे कार्यालयात पेटवून घेतले, पत्नी तारामतीचा न्यायासाठी संघर्ष!; जयंत पाटील न्याय देतील का?

बीड : बीडमध्ये मन हेलावून सोडणारी घटना समोर आली आहे. गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याची जराशी किव देखील आली नाही. बीड येथील पाली गावात २६ जानेवारीपासून तारामती साळूंके ही महिला स्मशानात एकटी आंदोलनाला बसली आहे. तिच्या आंदोलनाचे दहा दिवस उलटून गेले तरी तिच्याकडे पहायला व तिची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही. खरेतर तिची व्यथा आणि कथा अंगावर काटा आणणारी आहे. गेल्या वीस वर्षापासून ती व तिचे कुटूंब न्यायासाठी संघर्ष करत आहेत. न्यायासाठी झगडणाऱ्या तारामती साळूंकेने आपला पती गमावला, आपली सासू गमावली तरी पदरात न्याय पडला नाही.

तारामतीच्या कुटूंबाची वीस वर्षापुर्वी राज्याच्या पाटबंधारे खात्याने जमीन संपादित केली होती. मात्र आजपर्यंत या कुटुंबाला त्याचा मोबदला मिळाला नाही. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यामध्ये लक्ष घालून तारामतीला न्याय देतील का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारामती यांच्या परिवारातील यापूर्वी दोन माणसांचा न्याय मागता मागता मृत्यू झाला पण सरकारला जाग आली नाही. सासूने देखील न्यायासाठी मंत्रालयात हेलपाटे मारले. मात्र मुंबईत जाताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर तारामती यांचे पती अर्जून साळूंके यांनी देखील न्यायासाठी संघर्ष केला. मात्र त्यांचीही दखल कोणी घेतली नाही शेवटी त्यांनी पाटबंधारे कार्यालयात स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचाही अंत झाला. आता त्यांची पत्नी तारामती न्यायासाठी लढा देत आहे.

काय आहे प्रकरण?

तारामतीच्या कुटुंबाची वीस वर्षांपूर्वी राज्याच्या पाटबंधारे खात्याने जमीन संपादित केली आहे. बीड जिल्ह्यातील पाली या गावचे हे कुटूंब आहे. वीस वर्षापासून शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मागत आहेत. मात्र तो आजपर्यंत मिळाला नाही. त्यांना फक्त हेलपाटे मारावे लागत आहेत. पाटबंधारे विभाग त्यांना कोलण्याचे काम करत आहे. या वीस वर्षात तारामतीच्या सासूने मंत्रालयात कित्येक हेलपाटे मारले. कायदेशीर लढाई लढली. निकालही त्यांच्यासारखाच लागला. त्यांना मदत देण्याचे आदेश झाले पण पदरात फुटकी कवडी मिळाली नाही. संपादित जमिनीचे पैसे मिळावेत म्हणून मंत्रालयात चकरा मारणाऱ्या म्हातारीचा अखेर अपघातात मुंबईतच जीव गेला. आई मेल्यावर लेकाने हक्काचा संघर्ष चालू ठेवला. त्यालाही प्रशासन जुमानले नाही. अखेर त्या संवेदनशील माणसाने फरफट सहन न झाल्याने २४ नोव्हेंबर २०२० रोजी बीड च्या पाटबंधारे खात्याच्या कार्यालयातच पेटवून घेतले. त्यात त्याचा होरपळून मृत्यू झाला. आता त्याची बायको संघर्षाच्या मैदानात उतरली आहे. उतरताना ती स्मशानातच आंदोलनाला बसली आहे. तिच्या घरातली दोन कर्ती माणसं शासनाने व प्रशासनाने स्मशानात घालवली आहेत. आता तिलाही हे सरकार आणि प्रशासन यमसदनी धाडणार का ? हा संवेदनशील लोकांना पडलेला प्रश्न आहे.

महत्वाच्या बातम्या: